बोधेगावात महाराणा प्रताप यांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारला

Foto
फुलंब्री, (प्रतिनिधी): तालुक्यातील बोधेगाव येथील वीर शिरोमणी स्मारक समिती व सकल राजपूत समाजातर्फे शुक्रवारी (दि. ८ मे) रोजी मेवाडचे महापराक्रमी योद्धा महाराणा प्रतापसिंह यांचा १२ फूट उंच असा भव्य कांस्य धातूचा अश्वारूढ पुतळा बोधेगाव येथील बाजारपट्टी परिसरात उभारण्यात आला आहे.

विशेष म्हणजे हा तालुक्यातील पहिला महाराणा प्रताप यांचा पुतळा आहे. गाव व परिसरातील मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य पुतळ्याची स्थापना करण्यात आली. तत्पूर्वी बोधेगाव व परिसरातील संपूर्ण राजपूत समाज व गावातील सर्व धर्मीय बांधव यांनी पुतळ्याच्या आगमना निमित्त फुलंब्री येथून डीजे, ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढली. ठिकठिकाणी महिलांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूनी रांगोळी काढीत, फुलांची उधळण करीत महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचे स्वागत केले.

पुतळ्याची वैशिष्ट्ये म्हणजे १२ फूट उंचीचा पुतळा आणि १४ फूट उंच भव्य चौथरा, महाराणा प्रताप भालाधारी आणि अश्वारूढ रूपात आहेत. स्थापना प्रसंगी बोलताना मान्यवरानी सांगितले की, महाराणा प्रताप हे केवळ मेवाडचेच नाही, तर संपूर्ण भारताचे शौर्य, स्वाभिमान आणि राष्ट्रभक्तीचे प्रतीक आहेत. 

मुघलांविरुद्ध लढा देणाऱ्या या महापुरुषाचा पुतळा बोधेगावच्या मातीत उभारणे ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या सोहळ्याला राजपूत समाज सेवा संघाचे प्रतिनिधी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बोधेगाव येथील हा पुतळा आता तरुण पिढीसाठी प्रेरणास्थान ठरणार आहे. फुलंब्री तालुक्यातील बोधेगाव येथे महाराणा प्रताप यांचा अश्वरूढ पुतळा स्थापना करण्यासाठी घेऊन येतांना गावकरी.